Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
Untitled Document
अजिंक्य देव
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी  
"सर्जा" या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटाद्वारे एका उंच, देखण्या व उत्तम अभिनय गुण असणार्‍या एका तरुणाने काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. व नंतर "माहेरची साडी", " वाजवा रे वाजवा", "सरकारनामा" असे बरेचसे मराठी चित्रपट ज्याने हिट केले व नंतर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला थोडाफ़ार वाटा दिला. फ़ारसे यश हाती न येता ही ज्या नायकाला मराठी प्रेक्षक अजुन विसरु शकलेला नाही असा अजिंक्य देव आता तपानंतर पुन्हा आपल्या होम प्रॉडक्शन द्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पुन:पदार्पण करीत आहे.यंदा तो प्रेक्षकांसाठी स्वत:चा अभिनय व निर्मिती असलेली एक भव्य कलाकृती म्हणजे "वासुदेव बळवंत फ़डके". त्यानिमित्त घेतलेली त्यांची मुलाखत.
 
AjinkyaDeo चेतना: आपण खूप कालावधी नंतर प्रेक्षकांना दिसणार आहात? या चित्रपटाच्या निर्मितीला आणि तुमच्या पुर्नगमनाला इतका उशीर का झाला ?
अजिंक्य: हा चित्रपट हे माझ्या बाबांचे स्वप्न आहे. ते हे स्वप्न गेली ९ वर्षे जपत होते. चित्रपट निर्मितीसाठी जरी १ वर्ष लागलं असलं तरी गेली ९ वर्षे हा चित्रपट बाबांच्या मनात आकार घेत होता. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मी ह्या चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. राजस्थान मध्ये शुटिंग झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाबांचं हे स्वप्न साकार करण्यास इतकी वर्षे लागण्याचं कारण म्हणजे ह्या चित्रपट निर्मिती साठी पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. "वासुदेव बळवंत फ़डके" हे नाव इतिहासजमा झाले होते. इंग्रजांच्या साम्राज्याची वीट उपसुन ज्याने भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचला त्या आद्य क्रांतीकार्‍याला इतिहासात कुठेच काही स्थान नव्हते. बाबांचं स्वप्न असं होतं कि त्यांना "वासुदेव बळवंत फ़डके" हे नाव मोठं झालेलं पहायचं होतं. आणि चित्रपट सृष्टीशी एवढं घनिष्ट नातं असताना
चित्रपटा व्यतिरिक्त दुसरं माध्यम शक्य नव्हतं. एका आद्य क्रांतिकारी "वासुदेव बळवंत फ़डके" ची निर्मिती पैशासाठी नसुन हे नाव आजच्या पिढीपर्यंत ज्यांनी "वासुदेव बळवंत फ़डके" हे नाव ऐकलंही नसेल त्यांच्यासाठी आहे.

चेतना: चित्रपट निर्मितीचे काही अनुभव.
अजिंक्य: अनुभव तसे बरेच आहेत. जेव्हा चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला तेव्हा " वासुदेव बळवंत फ़डके" यांच्या बद्दल माहिती देणारी पुस्तके सुध्दा उपलब्ध नव्हती. ती माहिती आम्हाला पुण्यात मिळाली. वासुदेव बळवंत फ़डके वर जी केस चालु होती त्या केस मधुन आम्हाला बरीचशी माहिती मिळाली.शिवाय आमचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी इतिहास या विषयात एम ए केले आहे. यांची ही खुप मदत झाली. राजस्थानात शुटिंग चालु असताना आम्हाला ते शुटिंग पहाटे करायला लागायचं कारण दुपारी प्रचंड ऊन असल्याने ते शक्य नव्हतं. परंतु आम्ही जिथं जिथं शुटींग केलं तिथे आम्हाला तिथल्या लोकांचं, पूर्ण टिमचं भरपुर सहाय्य लाभलं. एकुणच चित्रपटाबद्दल खुप छान अनुभव आहेत.

चेतना: चित्रटासाठी काही खास मेहनत घेतली का?
अजिंक्य: मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे. जे दिग्दर्शक मला सांगतो तेच मी करतो आणि मी माझ्यासाठी फ़ार सामान्य अभिनेता आहे. या चित्रपटात माझी वेशभुषा खुप वेळा बदलते. वासुदेव बळवंत फ़डकें बद्दल ऐकल्यावर त्यांची जी व्यक्तीरेखा तयार झाली. ती माझ्यात उतरवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या सारखं दिसण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या बद्दल खुप वाचलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला. बाकी काही खास नाही. आणि भुमिकेत उतरण्या आधी त्या व्यक्तिरेखेला जवळुन ओळखुन घेण्याची खुप गरज असते.मी तेच केलं अणि यात मदत झाली ती गजेंद्र अहिरे यांची. संपूर्ण चित्रपटात वासुदेव बळवंत फ़डके यांच्यासाठी जे अपेक्षित होतं तेच त्यांनी माझ्या कडुन करुन घेतलं. त्यांनी अजिंक्य देव या व्यक्तीचा विचार न करता त्याला वासुदेव कसं बनवता येईल, प्रेक्षकांसमोर कसं सादर करता येईल तो विचार केला व मी ते करण्याचा प्रयत्न केला.
                                                           

चेतना: कॉमेडी चित्रपटाची डिमांड असताना एक ऐतिहासिक चित्रपट करण्याचं धाडस तुम्ही करत आहात. आणि त्यातुन मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाठ करत आहे. तर या बद्दल तुम्हाला काय वाटतं? काय बदल गरजेचे आहेत?
अजिंक्य:मराठी चित्रपटाच्या अपयशाचं कारण म्हणजे चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही. मराठी चित्रपट निर्माते आधी चित्रपट निर्माण करतात व निर्मिती पूर्ण झाल्या नंतर पब्लिसिटीकडे लक्ष न देता चित्रपट प्रदर्शित करतात. प्रेक्षकांना कळत सुध्दा नाही चित्रपट कधी पूर्ण झाला, कधी प्रदर्शित झाला आणि कधी चित्रपट गृहांतुन बाहेर पडला ते. असं न होता सर्व चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन चित्रपट सादरीकरण, प्रदर्शन या बद्दल विचार करुन जास्तीत जास्त प्रेक्षक कसा आकर्षित करता येईल त्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रेक्षकांना नाविन्य हवं आहे. व ते त्यांना देण्याचा निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार या सर्वांनीच प्रयत्न करायला हवा आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत जसं चित्रपट प्रदर्शनापुर्वी एक महिना आधीपासुनच त्यांची जाहिरात येण्यास सुरुवात होते. प्रत्येक चॅनल वरती त्यांच्या जाहिराती, गाणी झळकु लागतात. वितरणाच्या दृष्टीने हि मंडळी खुप मेहनत घेतात. त्यांचं अनुकरण नाही पण प्रेक्षक वर्गाला आपल्या चित्रपटाची माहिती करुन देण्यासाठी, त्याचं वेगळेपण दाखवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

चेतना: "वासुदेव बळवंत फ़डके" ला मराठीतील "द रायजिंग" म्हणता येईल का? चित्रपटाच्या टिमबद्दल काही?
अजिंक्य: मंगल पांडे हा हिंदी चित्रपट सृष्टीतील होता. आणि "वासुदेव बळवंत फ़डके" हा चित्रपट मराठीतील आहे. कारण मंगल पांडे सारखे बिगिनिन्ग बरेचसे चित्रपट हिंदीत येऊन गेले पण "वासुदेव बळवंत फ़डके" हा मराठीतील पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. जो एका क्रांतिकार्‍याचा जीवनपट उलगडुन सांगतो. ही मराठीतील एक भव्य कलाकृती आहे. जिची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांचा खुप मोठा सहभाग आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडुन मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे "वासुदेव बळवंत फ़डके" प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपट निर्माण करताना दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, कलाकार, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तसेच कॅमेरामॅन, मेकअप- मॅन सर्वांनीच या चित्रपटावर खुप मेहनत घेतली आहे. बाबांनी सुध्दा खुप मदत केली आहे.
 




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.