'कळत नकळत', 'अनुबंध', 'कुलवधु', 'माझिया प्रियाला प्रित कळेना' अशा अनेक
मालिकांची शिर्षकगीते प्रत्येकजण गुणगुणत आहे. काही जणानी आपल्या मोबाईलच्या
कॉलर ट्युनवरही गाणी अपलोड केली आहेत. खरोखरच या गीतांच्या भावना बोलक्या
आहेत आणि याचे सारे श्रेय गीतकार अश्विनि शेंडे हिला जाते. पण अश्विनि
मात्र हे श्रेय आपल्या आई वडिलाना देते कारण वाचन आणि संगीताची आवड त्यांनीच तिच्यात निर्माण केली.
बोरिवलिच्या सुविद्यालयातुन आणि पुढे साठे महाविद्यालयातुन आपल शिक्षण पुर्ण केलेली अश्विनि आपल्या शि़क्षकांचा आवर्जुन उल्लेख करते कारण त्यानीही
ट्क्क्यापेक्षा तिच्या कलागुणाना महत्त्व दिले. भरपुर वाचन केल्यामुळे तिचा शब्दसंग्रह वाढ्ला,
ज्यामुळे लेखणीतुन अगदी सहजपणे भावना प्रकट झाल्या.
'झी मराठी'
चे सलग तीन वेळा उत्कृष्ट गीतकाराचे ऍवॉर्ड घेउन तिने हॅट्रिक् केली आहे.
मराठी मुवी वर्ल्ड ने अश्विनि शी मारलेल्या गप्पा:
* तू या क्षेत्राकडे कशी वळालीस? लेखन हे तुझं फुल टाईम प्रोफेशन आहे कि तू या
व्यतिरीकत काही करतेस?
- लेखन हे माझं प्रोफेशन नसून हे मा़झं पॅशन आहे. लेखन न करता मी स्वस्थ बसू शकत नाही. मग
ते गाणं असो किंवा ते संवाद लेखन असो मी कोणत्या प्रॉडक्शन हाऊस साठी किंवा कोणत्या
कलाकारासाठी कोणत्या मालिकेसाठी लिहित आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाच माझ्यासाठी
हे असतं की ते मी लिहितेय. या क्षेत्रात येण्यापुर्वी मी कविता करायचे. त्याआधी ३-४
वर्षे मी पत्रकारिता केल ती इंडियन एक्सप्रेस व लोकसत्तासाठी. त्यानंतर 'कळत-नकळत'
साठी संबादलेखन व त्याचं शीर्षक गीत लिहीलं. आणि तेव्हापासून लोक
माझं
हे पॅशन माझं प्रोफेशन
म्हणून ओळखू लागले.
|
* तू लिहिलेल्या बर्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांची शिर्षक गीते खूप प्रसिद्ध
झाली आहेत. तुला कसं वाटतयं?
- छान वाटतयं. मला जे वाटतं ते मी सहज सोप्या शब्दात लिहीण्याचा प्रयत्न करते. कविता
गाणं जर सोप्या शब्दात असेल तर ते लगेच रुळत. काही वर्षांपूर्वी जी टिपिकल मराठी
भाषा वापरली जायची ती मी माझ्या लेखनात टाळण्याचा प्रयत्न करते. जेव्हा लोक सांगतात
कि "साध्या सरळ भाषेतली तुझी गाणी आम्हाला आपलीशी वाटतात व ती अगदी सहज गुणगुणता
येतात" तेव्हा माझे प्रयत्न यशस्वी झाले असे मला वाटते.* तू लिहिलेलं पहिलं गाणं कोणतं?
- सर्वात पहिल गीतलेखन मी वैशाली सामंतच्या 'स्वामी समर्थ' या भक्तीगीतांच्या
अल्बमसाठी केलं. पहिल चित्रपटगीत मी जे लिहील ते 'यंदा कर्तव्य आहे' साठी 'आभास हा....'. |
 |
* तुला मराठी चित्रपटसृष्टीबद्दल काय वाटतं? एक गीतलेखक म्हणून इथे योग्य मानसन्मान
मिळतो का?
- मराठी चित्रपट सृष्टीत सध्या खूप चांगल्या दर्जाचे चित्रपट येत आहेत.
त्याप्रमाणेच संगीताच सुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण झालं आहे. एक गीतकार म्हणून या
क्षेत्राने मला खूप काही दिले आहे. लेखन सोडून दुसरं काही कराव असं मला कधी वाटलं
नाही आणि तशी गरज सुद्धा निर्माण होऊ नये. गुलजारजींनी गीतलेखक म्हणून जे साध्य केलं आहे.
तिथपर्यंत पोहचण कठिण आहे पण ते ज्या उंचीवर आहेत त्या टोकाच्या थोडफार जवळ जाण्याची
माझी इच्छा आहे आणि मराठी चित्रपट्सृष्टी त्यासाठी पूरक आहे असे मला वाटते.
* "गाण्यांशिवाय चित्रपट होऊ शकत नाही" यावर तुझं काय मत आहे?
- कविता, गाणं हे शब्दातून भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. मला असं वाटत नाही
की प्रत्येक चित्रपट यशस्वी होण्यासाठी गाण्यांची गरज आहे. 'इरादा पक्का' मधलं सॅड
साँग, 'नटरंग' मधलं खेळ मांडला या गाण्यामध्ये कथानक पुढे सरकत राहतं त्यात आणि
त्याचे शब्द प्रेक्षकांना चटका लावून जातात. मला अशी गाणी लिहायला फार आवडतील.
कथानकाच्या गरजेनुसार त्यात गाणी असावीत असं मला वाटतं. कारण 'श्वास' मध्ये एकही गाणं
नव्हत तरी तो एक उत्कृष्ठ चित्रपट होता.
* एक गीतलेखक म्हणून गाण फायनल करायचे अधिकार तुला किती असतो? म्हणजे तुला काही बदल
करावे लागतात का नंतर त्यात?
- एकदा एखाद गाणं संगीतकाराकडे गेलं की आमचा त्यावरचा हक्क संपतो. त्यातले शब्द जर त्याच्या
बीट्मधे बसत नसतील तर त्यात बदल करावे लागतात. कधी कधी दिग्दर्शकांच्या
सांगण्यावरुन सुद्धा त्यात बद्ल करावे लागतात. मग ते बदल एका शब्दाचे असतात किंवा
एका ओळीचे सुद्धा असू शकतात. पण प्रत्येक गाण्याचं स्वतःच अस्तित्व असतं. त्यामुळे जे
माझ्या कडून लिहील जातं तेच प्रेक्षकांपर्यंत पोहचाव असा माझा आग्रह असतो.
* तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण.
- जेव्हा जेव्हा मी लिखाण करायला बसते आणि ते पुर्ण होतं तेव्हा तेव्हाचा प्रत्येक
क्षण हा माझ्यासाठी अविस्मरणीय असतो. कारण जेव्हा १० मालिकांची शिर्षक गीत पुर्ण
केल्यानंतर मी ११ व गीत लिहायला सुरुवात करते तेव्हा मी ते माझं पहिलं गाणं
असल्यासारखंच त्यावर मेहनत घेत असते. कारण ज्या फोर्सने मी ते लिहिते ते त्याच
फोर्सने समोरच्यापर्यंत डिलिव्हर होणं गरजेचं असतं...
* तू आता पर्यंत स्वतंत्रपणे किती मालिका आणि चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहेस?
- मी आतापर्यंत ३०-३५ मालिकांसाठी शिर्षक गीतं लिहीली आहेत आणि चित्रपटांसाठी एकूण
१५-२० गाणी लिहीली आहेत.
* तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल आम्हाला सांग.......
- आगामी 'पार्टनर'
आणि 'मन्या - द वन्डर बॉय' या चित्रपटासाठी मी गीतलेखन करतेय. 'मन्या - द वन्डर बॉय' हा एक खूप महत्त्वाचा
प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी. तसेच काही वेगवेगळ्या चॅनेलवरच्या मालिकांसाठी सुद्धा काम
चालू आहे. काही अल्बम्स आहेत पाईपलाईन मध्ये. या चंद्रकांत कुलकर्णींच्या 'अशी ही २०-३०'
या नाटकासाठी सुद्धा मी गीतलेखन करत आहे. यामुळे नाटक हे कधी न अनुभवलेलं क्षेत्र सुद्धा मला
लेखनासाठी अनुभवता येणार आहे.
|