गिरीश कुलकर्णी यांच्याशी मारलेल्या 'मसालेदार' गप्पा ट्प्पा
* 'वळू', 'विहिर', 'गाभ्रीचा पाऊस', 'देऊळ' अशा चित्रपटानंतर प्रवीण म्हणजेच आता
सुहाना मसाल्याचे चोरडिया कुटुंबावर किंवा त्यांच्या संस्थापकांच्या जीवन
चरित्रावर मसाला हा चित्रपट निर्माण करण्याची
कल्पना कशी सुचली ?
- 'मसाला' चित्रपटाची कथा ही 'प्रवीण मसाला'चे संस्थापक चोरडिया यांच्या जीवनपटावर
आधारीत नाही. ती संपूर्णपणे काल्पनिक कथा मी लिहिली आहे, पण त्यासाठी प्रेरणा मला
चोरडियांच्या जीवन प्रवासावरून मिळाली. एकदा त्यांच्याशी भेट झाली. गप्पागोष्टी
करताना त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड समजली. त्यांचा
साधेपणा भावला. सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण, भ्रष्टाचार असं दिसत असतानाच
त्याला छेद देणारी, चांगलं काम करणारी माणसं सुद्धा समाजात आहेत, हे पाहून उत्साह
वाढला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, सर्वांना बरोबर घेऊन माणुसकीचे नाते जपत कार्य
केलं तर यशस्वी होता येतं हे समजल्यावर एक कथा सुचली म्हणून मी ती त्यांना अर्पण
केली.
|
 |
* चोरडिया कुटुंबाला हे कळल्यावर आनंद झाला
असेल. त्यांची प्रतिक्रिया काय होती?
- अर्थातच, सध्या त्यांच्या उद्योगाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने
सुवर्णमहोत्सव चालू आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबतीत आहेत. आमच्या
चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या उद्योगाची माहिती सुद्धा सर्वदूर
पोहोचणार आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. ते आमचे
फायनान्सर आहेत.
* ही प्रवीण मसाला उद्योगाची कथा नाही, मग
चित्रपटाला मसाला हे नाव देण्याचे प्रयोजन काय ?
- त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन हा चित्रपट बनला. भारतीय संस्कृतीत
जेवणामध्ये मसाला महत्वाचा आहे.
त्याशिवाय पदार्थांना चव येत नाही. तसच जीवनाचं आहे. वेगवेगळे पदार्थ एकत्रित करून
ते एकजीव केले की मसाला तयार होतो व जेवण रुचकर बनते. वेगवेगळी माणसे, अनुभव, घटना
हे जीवनाला अर्थ आणतात. त्यामुळे जगण्याला चव येते. म्हणून 'मसाला' हे नावं दिले. |
* शुटिंग कुठे केलं? शहरात, गावांत की स्टुडीओत?
- ही पुण्यात घडणारी कथा आहे. त्यामुळे, बरेचसे चित्रण पुण्यात झाले. पण स्टुडीओत
सीन उभा करण्यापेक्षा गावागावात जाऊन प्रत्यक्ष उल्लेख केलेल्या स्पॉटवर जाऊन
चित्रण केल्यामुळे अधिक प्रभावी आणि वास्तववादी झालं आहे. यातील मुख्य पात्रे
कामासाठी गावागावातून फिरतात, हा कथेचा भाग आहे. त्यामुळे आम्ही सर्व युनिट घेऊन
गावागावात जाऊन शुटिंग केले.
* तुम्ही अनेक गावातून हिंडत आहात. मग गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? एखादी खास
आठवण सांगू शकाल का ?
- प्रतिसाद उत्तम मिळाला. अनेक मंडळी शुटिंग बघायला यायची, अनुभव खूप छान होते.
अनेकांनी आमचे पूर्वीचे चित्रपट बघितल्याची व आवडल्याची पावती दिली. कोल्हापूरच्या
वाटेवर मांढरदेवी हून परतणारा धनगरी समाज भेटला. त्यांनी तर अमृताची ओटी भरली. नगर
जवळ अनेक घरी आम्हाला जेवायला बोलावलं. प्रेक्षकांशी डायरेक्ट संवाद साधता आल्यामुळे
आमचा खूप फायदा झाला. गावातल्या लोकांनी खूप आपुलकीची वागणूक दिली.
* ग्रामीण व शहरी दोन्ही प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेऊन हा सिनेमा बनवला आहे का ?
- मसाला सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे हा चित्रपट सर्वांसाठी आहे. ज्यांना मराठी कळते
आणि नाही कळत त्यांच्यासाठी सुद्धा भाषा ही गौण आहे. भाषेची मर्यादा ओलांडून जगभर
सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट आहे.
|