आजकाल मराठी टीव्ही वर सर्वाधिक लक्ष खेचुन घेणारा कलाकार म्हणजे लोकेश
गुप्ते. 'कशाला उद्याची बात' मध्ये इन्स्पेक्टर रावराणे तर 'लज्जा'
मध्ये मंगेशच्या भूमिकेत त्याने आपली विशेष अशी छाप पाडली आहे. लोकेश
तसा नवकलाकार नाही. पण मराठी सिरिअल मुळे तो जास्त लोकप्रिय झाला. याआधी
त्याने नाटक, टी. व्ही. व सिनेमा या तीनही ठीकाणी आपला जम बसविला होता,
पण इतकी लोकप्रियता त्याला आधी मिळाली नव्हती.
आपल्याला आलेल्या अनुभवांबद्दल त्याने मराठीमुव्हीवर्ल्ड बरोबर केलेली
बातचीतः
* तू या क्षेत्राकडे कसा वळलास?
- माझ्या फॅमिलीमध्ये या क्षेत्रात कोणालाही रस नव्हता. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये
असताना आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. ग्रॅज्युएशन
पूर्ण झाल्यावर मी मुंबईला आलो. माझं पहिलं नाटक 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नंतर काही
काळाने ते नाटक बंद पडले नंतर मी विनय आपटेंकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं
३-४ वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. नंतर मी एडिटींग करायला सुरुवात केली. माझा
स्वतःचा एडिटींग स्टुडिओ होता. जवळपास ४ वर्षे मी ते चालू ठेवलं. पण मला बॅकपेन
वगैरे त्रास होऊ लागल्याने मी ते बंद केलं. या सर्व काळात माझा अभिनय मागे पडला होता.
म्हणून मी पुन्हा अभिनयाकडे वळलो आणि पहिली मालिका केली ती 'वादळवाट'.
|
* तुझ्या सध्याच्या दोन्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका पहायला मिळत आहेत?
- मला ऑफर्स आल्या तेव्हा मला त्या दोन्ही व्यक्तिरेखा खूप आवडल्या. दोन्ही भूमिका
जरी नकारात्मक असल्या तरी त्या दोन्ही भूमिका साकारताना मी त्या व्यक्तिरेखांमध्ये
पूर्ण गुंतलेला असतो. आणि मी त्या एन्जॉय करतो.
* तुला स्वतःला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात?
- मला असं वाटतं की जी भूमिका केल्यावर मला काही तरी चांगली भूमिका केल्याचं समाधान
मिळेल ती भूमिका साकारायला मला आवडतं. मग ती नकारात्मक भूमिका असो किंवा विनोदी. जे
काम मी करेन मला खात्री आहे कि ते मला चांगल काम केल्याचं पूर्ण समाधान देईन.
|
 |
|
* तुझे छंद कोणते?
- छंद जोपासण्यासाठी खर तरं वेळच मिळत नाही. पण जेव्हा शूटिंगमधून सुटका होते तेव्हा
मला कुकिंग करायला आवडतं. जुने चित्रपट पहायला आवडतात. गाणी ऐकायला आवडतात. शूटिंगला
जाताना - येताना जेव्हा मला माझ्या गाडीत रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी गाणी ऐकते.
* 'उलाढाल' आणि 'सखी' या दोन चित्रपटांमुळे तुला जेवढी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा
जास्त तू सध्याच्या या दोन मालिकांमुळे प्रसिद्ध झाला आहेस. काय कारण असावं असं तुला
वाटतं?
- 'सखी' बद्दल बोलायचं तर मी तो चित्रपट पाहुणे कलाकार म्हणून स्विकारला.भारती
आचरेकर आणि संजय सूरकर यांच्या विचारण्यावरुन मी ती भूमिका केली होती. आणि 'उलाढाल'
हा माझा खूप वेगळी भूमिका असलेला चित्रपट होता. त्यानंतर मला तशा अनेक भूमिकांसाठी
खूप ऑफर्स आल्या पण मला भूमिकांमध्ये, गेटअपमध्ये तोच तोच पणा नको होता म्हणून मी
त्या स्विकारल्या नाहीत. सध्याच्या दोन मालिकांबद्दल सांगायचं तर या मालिकांमुळे मी
घराघरात पोहचलो. रोजच्या रोज लोक मला बघतात. त्यांच्या मनात उत्सुकता असते की
पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार त्यामुळे ते मालिका पाहतात. आमची रोज ठरलेल्या वेळी
वाट बघतात. तस चित्रपटाच नाही. चित्रपट जेवढे दिवस चालेल तेवढेच दिवस त्याचं कौतुक
होतं व मालिका चर्चेत असतात म्हणून सध्या मी चर्चेत आहे असं मला वाटतं.
* 'डावपेच' या तुझ्या आगामी चित्रपटाबद्दल सांग.
- 'डावपेच' या चित्रपटात मी एका फूलशेती करुन घेणार्या शेत मालकाची भूमिका साकरतोय.
जो फूलांची शेती लोकांकडून करुन घेऊन त्यांना मोबदला देतो. ' डावपेच' हा एक चोरीचा
खेळ आहे जो त्या गावात वर्षातून एकदा खेळला जातो. मी जास्त काही सांगण्यापेक्षा
प्रेक्षकांना तो थिएटर मध्ये जाऊनच एन्जॉय करु दे. कारण या चित्रपटाचा शेवट खूप
वेगळा आणि अनपेक्षित आहे.
* तुझ्या आगामी प्रोजेक्टस बद्दल सांगशिल?
- 'डावपेच' हा माझी वेगळी भूमिका असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. तसेच
गिरीशजींचा 'प्रतिबिंब' हा चित्रपट सुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
|
|
|