"माझं चित्रपट आगमन हे थोडं स्पेशल आहे- मीता सावरकर"
मुंबईच्या विले पार्लेने अनेक उत्कृष्ट कलाकार या चित्रपट्सृष्टीला दिले. टिळक
विद्यालय आणि साठे कॉलेज शिक्षणासोबतच गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी
प्रसिद्ध आहे. मीता सावरकर ही ह्याच शिक्षण संस्थांचा एक हिस्सा. जिने जाहिरात
क्षेत्रात एक मॉडेल म्हणून खूप नावलौकिक मिळवला आहे. अतिशय उत्कृष्ट अभिनय असलेल्या
लोकांची या क्षेत्रात गरज असते आणि मीताने त्या गरजा पूर्ण केल्या. मायक्रोबायोलॉजी
या विषयात बी.एससी करत असताना ती अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घ्यायची. गेल्या
५-६ वर्षांपासून ती जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे आणि नेस्टले मिल्की बार, जॉन्सन
अँड जॉन्सन बेबी शॅम्पू आणि मुव अशा जाहिरातींमुळे तिचा चेहरा घराघरात पोहचला.
स्मिता तळवळकर यांच्या 'घरकुल' या मालिकेतून तिने मराठी मालिकांमध्ये पदार्पण केलं.
'झी मराठी' वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली. तिने त्या मालिकेत
एका अशा मुलीची भूमिका साकारली होती जिला मोडेलिंग मध्ये करिअर करायचं आहे. आणि
नेमकी ही मालिका तिला मॉडेलिंग मध्ये करिअर सुरु करण्यासाठी लकी ठरली. मीता, हि राजीव
पाटिल दिग्दर्शित 'पांगिरा' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
तिचा जाहिरात ते चित्रपट असा प्रवास जाणून घेऊया तिच्याकडूनच.
|
 |
* जाहिरात क्षेत्रात तर तू गेली ५-६ वर्षे काम केलं आहेस. आणि आता
तुझा पहिला चित्रपट प्रदर्शित होतोय. या दोन माध्यमांची तुलना तू कशी
करशील.?
- या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. जाहिरात शूट करायला २ दिवस
पुरेसे असतात आणि मराठी चित्रपटाचे एका दिवसात ४ सीन्स शूट होतात.
दोघांच्या बजेट मध्ये फरक आहे. आपल्याला जर चित्रपटातून काही संदेश
द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे दोन ते अडिच तास असतात आणि मात्र
जाहिरात करताना ते प्रॉडक्ट फक्त ३० सेकंदात प्रेक्षकांपर्यंत पोहचवायच
असतं आणि त्या प्रॉडक्ट सोबत स्वतःला सुद्धा. या दोन्ही मध्ये एक गोष्ट
नक्कीच कॉमन आहे ती म्हणजे मी ही दोन्ही माधम तेवढीच एन्जॉय करते. |
* तुझ्या आगामी 'पांगिरा' या चित्रपटाची कथा काय आहे.?
- विश्वास पाटिल यांच्या 'पांगिरा' या कादंबरीवर हा चित्रपट बनवण्यात
आला आहे. यात ३-४ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेती, पाणी, वीज, तसेच गावतले सरपंच आणि
त्यांचे काही जवळची माणसं आणि विरोधक यांच राजकारण अशा काही गोष्टी या
चित्रपटातून समोर येतात. मनोरंजनासोबत एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचावा
हा आम्हा सर्वांचा उद्देश आहे. संजय कृष्णाजी पाटील हे स्वतः डेप्यु.
कमिशनर असल्याने त्यांनी हा विषय चित्रपटाच्या माधमातून लोकांसमोर आणण्याचा
निर्णय घेतला.
* या चित्रपटात तुझी काय भूमिका आहे.
- या मध्ये मी सुमित्रा नावाच्या मुलीची भूमिका करतेय. जी PhD करत आहे. आणि
रिसर्च साठी शहरातून गावात आली आहे. पण रीसर्च करताना ती गावाला अगदी जवळून
बघते. ती त्या गावातल्या प्रश्नांमध्ये नकळतच गुंतत जाते. यात मी खूप
सिरीअस भूमिका करत आहे. जे खूप सेन्सिटीव्ह आहे. ते स्वतंत्र आहे स्ट्राँग
आहे. तिच्यात स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आहे.
एक सांगायचे म्हणजे मी जी भूमिका करतेय ती 'पांगिरा' या कादंबरी मध्ये नाही.
ते पात्र आमच्या कथालेखकाने स्वतंत्रपणे तयार केल आहे. माझ्या भूमिकेला
कादंबरीचा बेस नाही. चित्रपटाच शुटिंग चालू होण्यापूर्वी ३ दिवस आधी माझं
या चित्रपटासाठी कास्टिंग झालं
* चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा
होता?
- अनुभव एकदम मस्तच होता. मोडेलिंग करत असताना मला असं वाटायचं की मला एखादा
माझ्या मातीतला चित्रपट करण्याची संधी मिळावी आणि ती संधी मला 'पांगिरा'
च्या रुपाने मिळाली.त्यातच सोन्याहून पिवळ म्हणजे राजीव पाटीलच दिग्दर्शन.
पहिलाच चित्रपट आणि राजीव पाटील सारख्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं
म्हणजे मी माझं भाग्यच समजते. त्याच व्हिजन एकदम क्लिअर असतं तो सगळा
अभ्यास घरीच करुन येतो. सेटवर आल्यावर तो फक्त काम करतो. त्याला जे हव
असतं तेच त्याला दिसतं आणि इतरांनाही दाखवतो.
* तुझ्याशी बोलताना असं जाणवत नाही की तू गंभीर भूमिका करु शकतेस.
म्हणजे तू एकदम जॉली वाटतेस. मग तू ही भूमिका कशी पार पाडली?
- या चित्रपटाचं स्क्रिप्ट सुद्धा मी वाचलेलं नाही. त्यामुळे मी अभ्यास
वगैरे तर केलाच नाही. मी जशी आहे तशी न दाखवता अशा प्रकारची भूमिका
साकारायला मिळाली म्हणून मी खूप खुष आहे. कारण तुम्ही जसे आहात तसे न दाखवता
दुसर काहीतरी भूमिका करणे यालाच मी अभिनय उत्तम जमणे असं म्हणते. आणि जर ते
उत्तम जमल तर प्रेक्षक त्याच कौतुक नक्कीच करतात.
* या पुढचं तुझ काय प्लॅनिंग आहे.
- हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होईल. सध्यातरी माझ्याकडे काही चित्रपट
नाही. पण हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचल्यानंतर ज्या प्रतिक्रीया येतील
त्यावर माझं पुढचं पाऊल ठरेल. तो पर्यंत मी माझं जाहिरातीच क्षेत्र मी
चालूच ठेवेन. विनोदी भूमिका करायला आवडेल.
|