Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
मृण्मयी देशपांडे
मुलाखतः उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी
चित्रपट व मलिकांमधील कलावंतांना प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी बराच कालावधी द्यावा लागतो. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून नावलौकिक मिळवणे हे काही वाटतं तेवढं सोपं नव्हे. पण काही मोजके कलाकार याला अपवाद असू शकतात. त्यांच्या पहिल्याच सीनमध्ये ते प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष ठसा उमटवून जातात. त्यांचा चेहरा जणू कॅमेर्‍याच्या इमेजप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतो. नवोदित कलाकार मृण्मयी देशपांडे ही अशा कलाकारांपैकीच एक आहे. अल्पावधीतच मृण्मयीने आपला एक प्रेक्षकवर्गच निर्माण केला आहे. खास करुन तरुण वर्गात ती खूपच लोकप्रिय झाली आहे. तीक्ष्ण नजर, गोड चेहरा आणि साधेपणा यांच्या साथीने तिने आपल्या अभिनयात एक वेगळेपणा आणला व स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या या नवीनच सुरु झालेल्या प्रवासाबद्दल मृण्मयीने मराठीमुव्हीवर्ल्डशी मारलेल्या दिलखुलास गप्पा.
 
Mrunmaye Deshpande अभिनयाचा वारसा तुला जरी घरुनच मिळाला असला तरी नेमकी सुरुवात कशी झाली?
- मी इयत्ता ७ वीत असल्यापासून अभिनय क्षेत्रात आहे. त्यावेळी मी पुण्याच्या रेणुका स्वरुप शाळेत शिकत होते. आजी- आजोबा आणि आईच्या संगतीत मी अभिनय शिकले आणि कथ्थक याचे शिक्षण चालूच होते. जेव्हा मी एस. पी. कॉलेजात गेले तेव्हा मात्र मला नाट्यक्षेत्राचा एक प्लॅटफॉर्मच मिळाला. 'पोपटी चौकट' व 'कंडिशन्स अप्लाय' ची दिग्दर्शनाची जबाबदारीही माझ्याकडेच होती त्यामुळे प्रॉडक्शन म्हणजे काय हे तेव्हा कळाले. बरीच मेहनत घेतली होती आमच्या ग्रुपने. ऐन स्पर्धेच्या वेळी आम्ही जेमतेम २-३ तासच झोपत असू. पण त्याचा फायदा मला आज होत आहे.

'हमने जिना सिख लिया' या चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली?
- श्री मिलिंद उके हे मुळचे नागपूरचे, पण ते संजय लिला भन्साली यांचे असिस्टंट होते. त्यांनी
आपल्या १५० मित्रांसमवेत फायनान्सची व्यवस्था करुन हा चित्रपट बनविण्याचे ठरविले. तेव्हा ते तरुण मुलामुलींच्या शोधात होते की ज्यांना स्टेजचा अनुभव होता. माझी निवड त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी केली.

मालिकांमध्ये कसा काय प्रवेश मिळवलास?
- 'अग्निहोत्र' साठी श्रीरंग गोडबोले हे नवकलाकारांच्या शोधात होतेच. त्यांनी माझी निवड 'सई' च्या भूमिकेसाठी केली. आणि 'कुंकू' बद्दल सांगायचे तर जेव्हा 'कुंकू'च्या निर्मात्या संगिता राकेश सारंग यांची माझ्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी मला ऑडीशनसाठी मुंबईला येण्यास सांगितले. तिथे टेस्टनंतरच त्यांनी मला 'जानकी'च्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी निवडले.

सई आणि जानकी या दोन्ही भूमिकांमध्ये तुलना तू कशी करशील? कोणती भूमिका जास्त प्रभावी वाटते?
- दोन्ही भूमिकांमध्ये बिलकुल साम्य नाही. सईची भूमिका म्हणजे शहरी वातावरणात वाढलेली एक मॉडर्न अशी मुलगी आहे. या उलट जानकी ही गावात गरीबीत वाढलेली तरुण मुलगी आहे. त्यामुळे त्या त्या सेटवर जातांना मानसिक तयारी खूप करावी लगते. पण मला दोन्ही भूमिका आव्हानात्मक वाटतात. या मध्ये मी भेदभाव करु इच्छित नाही. शेवटी कलाकाराला नैपुण्य दाखविण्याची संधी ही मिळणारच. मग तो सीन छोटा असो वा मोठा.

दोन्ही् मालिकांमध्ये तू अनुभवी, नाववंत कलाकारांसोबत काम केले आहेस. त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
- खुपच छान. श्री. मोहन जोशी, सौ. सुहास जोशी आणि इतर सर्व कलाकार हे खरोखरच नामवंत कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हेच खूप होते. ही सर्व मंडळी अगदी एका कुटुंबाप्रमाणे सेटवर वावरतात त्यामुळे सिनिअर- ज्युनिअर अशी जाणीवच होत नाही. आतासुद्धा माझ्या मुंबईच्या मुक्कामात मी सौ. सुहास जोशी यांच्याच घरी राहिले. 'अग्निहोत्र' मध्ये त्या माझ्या आजीची भूमिका करत आहेत. पण खरोखर प्रत्यक्ष जीवनातही त्या तितक्याच प्रेमळ आहेत. त्यांची माझ्यावर खूप माया आहे.
 

शिक्षण आणी अभिनय या दोन गोष्टींची सांगड कशी घालतेस?
- सध्याच्या या अतिव्यस्त अशा अभिनय क्षेत्रात आल्यामुळे अभ्यासाकडे माझे थोडे दुर्लक्षच होत आहे. बी. कॉम झाल्यानंतर एम. कॉम करत असतानाच मी या दोन मालिकांमध्ये व्यस्त झाले. त्यामुळे एम. कॉम पार्ट टु ची परीक्षा मी देउ शकणार नाही. पण लवकरच मी एम. कॉम तर करेनच पण सी.ए. ची परीक्षा देण्याचा विचार आहे.

पण मग ते करताना तू अभिनय क्षेत्रात थोडी विश्रांती घेणार का?
- एकदा अभिनय क्षेत्र निवडल्यावर त्याकडे दुर्लक्ष नाही. पण अभ्यासही तेवढाचं महत्त्वाचा वाटतो. शिवाय शि़क्षणाची खरी गरज केव्हा पडेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार सामना करण्यासाठी शि़क्षणाचा नक्कीच उपयोग होतो.
 

अजून कोणते प्रस्ताव तुझ्यासमोर आहेत?
- मी अजून कुठलेच प्रस्ताव स्विकारलेले नाहीत. पण सुमित्रा भावे यांचा 'एक कप चहा' हा चित्रपट नुकताच पुर्ण केला आहे. यात माझी महत्त्वपूर्ण भूमिका आहे.



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.