Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
Untitled Document
निळू फुले
चेतना ©मराठीमुव्हीवर्ल्डसाठी
*मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केव्हा व कसे झाले?
- मी सुरुवातीला एका कला पथकातून लोकनाट्य करायचो. त्यानंतर मी व्यवसायिक लोकनाट्य 'कथा अकलेच्या कांद्याची' यातून नाट्य सृष्टीत पदार्पण केले. या लोकनाट्याचे जवळजवळ २००० प्रयोग पूर्ण केले. त्याच्या दुसर्‍या अंकात मला पुढार्‍याची भूमिका साकारायची होती. ती माझ्या प्रयत्नाने साकारली व माझे ते काम पाहुन चित्रपटसृष्टीतील काही मंडळी जसे की, अनंतराव माने यांनी मला चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली. तेव्हा मी मला मिळालेली संधी न दवडता 'एक गाव बारा भानगडी'  या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. योगायोगाने तो चित्रपट खूप चालला व माझे त्या एका वर्षात जवळजवळ ७ चित्रपट प्रदर्शित झाले.
त्यानंतर मी साधारणत:  दरवर्षी मराठी ७-८ सिनेमे व नाटकाचे १०० प्रयोग करत राहिलो. व मी आत्तापर्यंत सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर काम केलेले आहे. फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटामध्येसुद्धा बर्‍याचश्या म्हण्जेच जवळ्पास १२ चित्रपटांमधून काम केलेले आहे. आणि मराठीतून जवळपास १३८-१४० सिनेमे मी केले आहे. मला महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे १९७२, १९७३ आणि १९७४ साली पुरस्कार मिळाले आहेत.  तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. व 'सुर्यास्त' या नाटकाकरीता नाट्यदर्पण हा पुरस्कारही मिळाला आहे.
  • * चित्रपट किंवा नाटकातून काम करताना तुम्ही नाकारलेली एखादी भूमिका व त्यामागील कारण?

  • नाही; मी चित्रपटातील कोणतीही भूमिका नाकारलेली नाही. त्या सर्वच नाविन्यपूर्ण होत्या. माझ्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार होते. मी गावचा सरपंच, मदत करणारा, सासरा आणि वडील ही प्रत्येक भुमिका तेवढ्याच आत्मियतेने केली. परंतु नाटकाचा विषय  मला पटला नाही; तेव्हा मी त्या नाटकात काम करण्यास नकार दिला. त्याच त्याच भूमिका करायचे क्षेत्र मी नाकारले.

    * भूमिका करताना मूळ स्वभाव कोठे आड आला का?  तुमच्या भूमिकांचे तुमच्या जीवनावर  काही चांगले वाईट परिणाम झाले का? चित्रपट किंवा नाटकातून काम करताना स्वभाव कोठेही आड येत नाही. आपला स्वभाव खलनायकाचा नसला तरी आपल्याला खलनायकाची भूमिका पार पाडावी लागतेच. स्वभाव कसाही असला तरी त्या भूमिकेचे गुण- दोष लक्षात घेऊन ती कागदावरची भूमिका जिवंत करणे हे कलावंताचं ध्येय असेल तरच तो ती भूमिका पडद्यावर जिवंत करू शकतो. म्हणजे लोकांनी फक्त मला लक्षात ठेवावं असा माझा हेतू बिल्कूलही नसावा तर मी साकारलेली भूमिकासुद्धा त्यांनी लक्षात ठेवावी म्हणून मी त्या भूमिकेबद्दल  सतत जागृत रहातो. पण मी आतापर्यंत नकारात्मक भूमिकाच जास्त केल्या आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की सर्वसाधारण समाजात म्हणजेच ग्रामीण भागातील स्त्रियांचा समज असा झाला की, ही व्यक्ती स्वभावाने अशीच आहे. ही व्यक्ती फार दुष्ट आहे. त्यामुळे गावाकडील स्त्रिया मग त्या शिक्षीका असो किंवा नर्सेस त्या माझ्यापासून दूरच राहू लागल्या. माझ्याशी फारशा बोलतही नसत. खलनायकाची भूमिका अधिकवेळा केल्याने माझी जी प्रतिमा झाली तिचा त्रास अजूनही होतो.


    *चित्रपट, नाटक यांपैकी तुमचं आवडतं क्षेत्रं कोणतं? तुमचे आवडते चित्रपट, नाटक कोणते? नाटक हे क्षेत्र मला आवडते आणि ते प्रत्येक नटाला आवडते. कारण तुमची कामगिरी चोख असेल तर त्याची दाद तुम्हाला लगेच प्रेक्षकांकडून मिळ्ते. इथे सरावामध्ये रिटेक आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही ऑन द स्पॉट जी कलाकृतीसादर करता त्यावरच तुमचे यश अवलंबून असते. या क्षेत्रात अभिनेत्याला अधिक अलर्ट रहावं लागतं. इथे चुकांना अजिबात स्थान नाही. तुमच्या अभिनयाच्या जोरावरच तुम्हाला माय- बाप प्रेक्षकांना जिंकावं लागतं.जर अभिनेता म्हणून तुम्ही नाकारला गेलात तर पुन्हा उभं रहाणं कठीण जातं. नाटकात कौतुकही समोरून असतं आणि टिकाही समोरूनच असतात. चित्रपटात काम करणं नाटकात काम करण्याइतकं चॅलेंजिंग वाटत नाही. मी आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी 'सामना' , 'सिंहासन', 'चोरीचा मामला', 'शापित', 'पुढचं पाऊल' हे चित्रपट माझे आवडते आहेत. कारण ह्या चित्रपटातील भूमिका माझ्या आवडत्या भूमिका आहेत. तसेच सुर्यास्त हे नाटक व त्यातील सखाराम ही भूमिका माझी आवडती भूमिका आहे. तसेच 'कथा अकलेच्या कांद्याची' या नाटकातील भूमिकाही माझी आवडती भूमिका आहे.

    *
    पूर्वीचे मराठी चित्रपट आणि सध्याचे मराठी चित्रपट यामध्ये काही फरक जाणवतो का?
    पूर्वी मराठी चित्रपट हे तमाशा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या विषयांवर अवलंबून असे. जसे की 'सामना', 'पिंजरा', 'शापित'. आणि सध्याच्या 'विश्वास', 'डोंबिवली फास्ट', 'श्वास' सारख्या मराठी चित्रपटातून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. हि मराठी चित्रपटात होणारी प्रगती आहे. 'श्वास' हा पहिला मराठी चित्रपट, ज्याने ऑस्कर पर्यंत मजल मारली.तसेच नाटकांतूनही बरेचसे विविध विषय हाताळले आहेत. तरूण पिढिचे प्रश्न व राहणीमानातील बदलांमुळे त्यांच्या वाढलेल्या गरजा या सध्याच्या नाटक आणि चित्रपटातून मांडण्यात येत आहेत. व प्रेक्षक वर्गही त्या बदलांना दाद मिळत आहे.

    *शासनाकडून जसे चित्रपटांसाठी अनुदान मिळत आहे तसे तमशा / लावणीच्या कार्यक्रमांना मिळावे म्हणून काही प्रयत्न ?
    - तमाशा, नाटक, लावणी ह्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून जरी प्रतिसाद मिळत असला तरी ह्या कलाकृती अजून तेवढया प्रसिद्ध नाहीत. ह्या कलाकृतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने नाटकाला- तमाशाला सुद्धा अनुदान मिळेल अस कबुल केल आहे. 

    * चित्रपट निर्मितीक्षेत्राकडे वळावे असे नाही का वाटले?
    निर्मिती हा फार खर्चिक भाग आहे. आपण जेवढी गुंतवणूक करूतेवढाच मोबदला मिळेल याची शाश्वती नाही. सध्या तरी चित्रपट निर्मितीचा काहिही विचार नाही. 'कथा' हा चित्रपटाच्या यशातील महत्त्वाचा भाग आहे. कथा अतिशय जोमदार हवी. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे दिग्दर्शक कारण कलाकारातील मर्यादा ओळखून त्याकडून जेवढ परफेक्ट काम करून घेता येईल तेवढ करून घेण्याची जवाबदारी ही दिग्दर्शकाची असते. त्यानंतर तंत्रज्ञ कारण तांत्रिक दृष्ट्या चित्रपट परफेक्ट नसेल तर चित्रपट यशस्वी होउच शकत नाही. व त्यानंतर कलाकार.

    * छोटा पडदा व मोठा पडदा यामध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे त्याबद्दल तुमच काय मत आहे?
    छोट्या पडद्याला मर्यादा असतात. चांगल्या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी ते तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच बघावे लागतील, कारण चित्रपटात दखविली जाणारी निसर्ग दृश्ये, स्पेशल ईफेक्ट् इ. गोष्टींचा आनंद तुम्ही मोठ्या पडद्यावरच घेऊ शकता. पण मध्यम वर्गीयांना सध्याचे तिकिटाचे दर परवडणारे नसतात त्यामुळे मालिका व चित्रपट हे छोट्या पडद्यावर म्हणजेच घर बसल्या कमी खर्चात बघून होतो.

    * सध्या काय करत आहात?
    - सध्या मी खूप वाचन करत आहे. चांगले चित्रपट, चांगली नाटके पाहतो. बागकामाची आवड आहे. थोडिफार सामाजिक कामे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कामे करतो आहे. कारण लोक अजुनही कालबाह्य रुढी, परंपरा यामध्ये अडकून पडले आहेत. समाज अधिक विज्ञान निष्ठ, विवेकी व्हावा म्हणून यामध्ये मी थोडा सहभाग घेतो. आणि चित्रपटांच्या बाबतीत बोलायच झाल तर माझी छोटिशी भूमिका असलेले चित्रपट लव़करच प्रेक्षकांच्या भेटिस येतील.

    * आगामी कलाकारांना काही संदेश?
    - त्यांनी खूप वाचन कराव, खूप पहाव, नाटक, सिनेमे पहावेत. चांगले-वाईट पहावेत. वाचनान कलावंत समृद्ध होतो. आपल्या आवाजाचा रियाज करावा. आवाज टिकऊन ठेवण फार महत्त्वाच असत. शरिर स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. शंभू मित्रा नावाचे दिग्दर्शक असे म्हणायचे की ''शरिर हे नटाचे वाद्य आहे. ज्याचा वादकही तोच आहे. म्हणजेच ते त्यालाच वाजवावे लागते. नियमित आहार, व्यायाम हे फार महत्त्वाच आहे.

    


    मुख्यपृष्ठ
    I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
    ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
    Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
    Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
    © 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

    -: A Project by :-
    Honeybee Media
    Honeybee Media Pvt. Ltd.