"प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान."
अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी
प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी
असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला
प्रेरणा मिळत राहील.
आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद
पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे. गणपतीबाप्पांवर अपार
श्रद्धा आणि स्वातंत्रावीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांद्वारे मिळालेली
प्रेरणा हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली.
शरद पोंक्षे यांची प्रत्यक्ष भेट
घडली ती गोरेगांव मधील स्टुडिओत 'कुंकू' मालिकेच्या सेटवर. 'मराठीमुव्हीवर्ल्ड'शी
बोलताना त्यांनी प्रकट केलेले त्यांचे हे विचार.
 |
लहानपणापासूनच माझी अभिनेता
होण्याची इच्छा होती. भायंदरला अभिनव विद्या मंदिरात शिकत असतानाच मी एकांकिका
स्पर्धेत भाग घेतला. १२ वी ची परीक्षा पास झाल्यावर मी ३ वर्षाचा गव्हर्मेंट
डिप्लोमा केला व BEST मध्ये नोकरी धरली. त्यावेळी नोकरीशिवाय केवळ व्यवसायिक
रंगभूमीवर काम करून मी घर चालवू शकलो नसतो.
BEST च्या नोकरीत असताना हौशी
रंगभूमीवर खूप काम केलं व त्यानंतर १९८९ मध्ये 'वरुन सगळे सारखे' हे पहिलं
व्यवसायिक नाटक केलं. १९८८ साली 'दे टाळी' या चित्रपटात छोटा रोलही केला. पण
'दामिनी' या दूरदर्शन मालिकेत जेव्हा माझी उदय कारखानीस या पत्रकाराच्या भूमिकेसाठी
निवड झाली तेव्हा मात्र एक अभिनेता म्हणून चांगले दिवस येत |
|
असल्याची जाणीव झाली. त्यात भर पडली ती 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील प्रमुख भूमिकेची. १० जुलै
१९९८ ला 'नथुराम...' चा पहिला प्रयोग झाला आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळीच
कलाटणी मिळाली. मी अभिनयाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रीत केल आणि ऑफिसमध्ये बिनपगारी
रजा घेतली. शेवटी एक पक्का निर्णय घेऊन BEST च्या नोकरीला सन २००० मध्ये राम राम
ठोकला.
'दामिनी' मालिका ८ वर्ष तुफान चालली तर 'नथुराम. . ' चे
प्रयोगही जोरात होत होते. एक अभिनेता म्हणून मी संतुष्ट होत होते. एक अभिनेता
म्हणून मी संतुष्ट होतो. लवकरच 'वादळवाट' या मालिकेत देवराम खंडागळे या कपटी
पत्रकाराची भूमिका मिळाई आणि एक खलनायक म्हणून माझा उदय झाला. योगायोग असा की मी
करत असलेल्या तिनही भूमिका पत्रकाराच्या होत्या पण भिन्न भिन्न होत्या. नथुराम हा
तत्त्वनिष्ठ, उदय कारखानीस हा सरळमार्गी तर देवराम हा हरामखोर पत्रकार होता.
देवराम खंडागळेची भूमिका तर एवढी गाजली की सलग तीन वर्ष या भूमिकेसाठी मला
सर्वोत्कृष्ट खलनायकाचा 'झी पुरस्कार' मिळाला. मला एकाच गोष्टीचे वाईट वाटते
ते म्हणजे 'नथुराम...' ला आजपर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही पण हे नाटक ज्यांनी
पाहिले त्यांनी दिलेली दाद हाच मला मिळालेला सर्वोच्च सन्मान असे मी समजतो.
आत्तापर्यंत बर्याच नाववंत व्यक्तिंनी मला हे नाटक पाहिल्यावर आशीर्वाद
दिले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेन तो सदगुरु वामनराव पै व कै चित्तरंजन
कोल्हटकर व कै सुधीर फडके यांचा. यांच्याव्यक्तिरीक्त पंडीत सी. आर. व्यास, डॉ.
श्रीराम लागू व स्वामी धर्मेंद्रजी यांनीही खुप स्तुती केली. एका चाहत्याने तर मला
अंदमानमधली सावरकरांच्या कोठडीतील वाळू बक्षिस म्हणून दिली. सावरकरांच्या विचारांचा
माझ्यावर चांगलाच प्रभाव आहे. 'सावरकर विचारदर्शन आणि हिंदू राष्ट्रवाद' या विषयावर
मी परिसंवादात बोलतो.
'नथुराम्..'च्या प्रयोगाबद्दल अजून बोलायचे म्हणजे दोन
अविस्मरणीय आठवणी. एकदा कोल्हापूरमधील प्रयोगानंतर कुलकर्णी म्हणून एक निवृत्त
शिक्षक मला भेटण्यास आले. त्यांनी प्रथम मला नाटकातील अभिनयाबद्दल दाद देत मिठी
मारली पण लगेच आणखी एक इच्छा प्रकट केली ती म्हणजे मी साकारलेल्या 'वादळवाट' मधील
देवराम च्या भूमिकेमुळे त्यांच्या मनात उदभवलेल्या क्रोधाची पोच देण्याची. ती इच्छा
मी मान्य केली आणि त्यांनी माझ्या थोबाडीतच मारली. मी त्यावर विचार केला की ही
माझ्या अभिनयाची पावती आहे.
दुसरा प्रसंग हृदयाला हेलावणारा होता.
पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातील प्रयोगानंतर एक साधारण कुटुंबातील स्त्री माझ्या
अभिनयाचा गौरव म्हणून एक पाकिट घेऊन आली. तिने खूपच आग्रह केला म्हणून मी त्या
पाकिटात काय आहे ते उघडून पाहिले. त्यामध्ये तिने सही केलेला एक कोरा चेक होता. एक
अद्भूत आठवण म्हणून आजही तो चेक लॅमिनेट करुन घरी ठेवला आहे.
सध्या जोरात चालू असलेल्या तीन मालिकांतील आपल्या भूमिकांबद्दल बोलताना त्यांनी
सांगितले की प्रत्येक भूमिका ही पूर्णतः वेगळी आहे. "जेव्हा मी सेटवर येऊन त्या
व्यक्तिरेखेचा पोषाख चढवतो, तेव्हा ती व्यक्तिरेखा माझ्या शरीरात भिनते व मी आपोआपच
तसा बोलू व चालू लागतो. मग तो 'अग्निहोत्र'मधील महादेव असो, 'कस्तुरी' मधील मकरंद
असो वा 'कुंकू' मधील परसु असो. त्यात आता भर पडणार आहे ती 'भैरोबा' या साम
मराठीवरील मालिकेची.
अशा ह्या मराठी वाहिन्यांवरील अत्यंत कार्यमग्न
अभिनेत्याने आपले साधेपण मात्र अजूनही जपले आहे. कदाचित सेटवरील त्यांच्या
हास्यविनोदांमुळे हे शक्य होत असावे. याचे श्रेय त्यांच्या सतत हसर्या खिलाडू
वृत्तीला जाते.
|