अभिनय क्षेत्राच्या आपल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत सुनील बर्वे या गुणी कलाकाराने
आपल्या खास शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नाटक, सिनेमा व मालिका या
करमणुकीच्या तिन्ही माध्यमात त्याने आपला असा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
२५ वर्षांपूर्वी जेव्हा त्याने या क्षेत्रात प्रवेश केला तो त्याच्या आयुष्यातला
अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर सुनीलने सर्व
सामान्याप्रमाणे नोकरीचा मार्ग पत्करला. पण यु. एस. विटॅमिन्स या कंपनीतील मेडीकल रिप्रेझेंटेटिव्हच्या
नोकरीला पहिल्या पगारानंतरच रामराम ठोकून त्याने नाटयक्षेत्रात प्रवेश केला.
अभिनय जणू त्याच्या नसानसातच भरला असावा. त्यावेळी गुरुच्या रुपात विनय आपटे भेटले
व सुनीलच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यानंतरच्या त्याच्या अभिनयाच्या
प्रवासात भक्ती बर्वे, वंदना गुप्ते, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप कुलकर्णी
तसेच मोहन जोशी व सुधीर जोशी अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला
मिळाली. विक्रम गोखले या कलाकाराला आदर्शस्थान समजणार्या सुनीलला त्यांच्याबरोबर
काम करण्याची संधीही योग्य वेळी मिळाली.
अभिनयक्षेत्रात २५ वर्षाच्या कालावधीनंतर सुनीलने एक अतिशय आगळावेगळा प्रयोग
करण्याचे योजले आहे. जुन्या काळातील निवडक ५ नाटकं घेऊन 'हर्बेरियम' या त्यांच्या उपक्रमाचे
जोरदार स्वागत झाले आहे. याचे बोलके उदाहरण
म्हणजे 'सुर्याची पिल्ले' या नाटकाचे
हाऊस फुल्ल प्रयोग. अभिनय क्षेत्रातील त्याच्या अनुभवाबद्दल मराठीमुव्हीवर्ल्डशी सुनीलने मारलेल्या
दिलखुलास गप्पा.
|
 |
तुझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला २५वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तुझे हार्दीक अभिनंदन.
- धन्यवाद
तुमच्या 'हर्बेरियम' या नवीन उपक्रमाबद्दल बरेच ऐकले आहे. काय आहे ही संकल्पना?
- अभिनय क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या अनुशंगाने प्रेक्षकांना काहीतरी वेगळे
देण्यासाठी म्हणून हा उपक्रम आखला. जुन्या दर्जेदार नाटकांच पुनरुज्जीवन करण्यासाठी
५ नाटक निवडली व नवीन कलाकारांसोबत त्याच सादरीकरण होत आहे.
'सुर्याची पिल्ले' या नाटकाद्वारे सुरुवात करुन पूर्ण वर्षभर मग एकापाठोपाठ एक अशी अजून ४ नाटकं सादर
करण्याचा हा उपक्रम आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. |
|
या नाटकाचे तिकीट दर जास्त असल्याची प्रतिक्रिया टीकाकारांमार्फत होत आहे.
याबद्दल काय म्हणाल?
- असं काही होइइल अशी अपेक्षा नव्हती. कारण या नाटकाचे फक्त २५ प्रयोग सादर करण्याचे
जाहिर झाले होते. शिवाय आजचे चांगले कलाकार व नाटकाचा खर्च गृहित धरुन तशी तिकीट
ठेवली आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. मला वाटतं या वर्षअखेर
सर्वांना माझा हेतू कळेल तेव्हा टीकांना काहीच वाव मिळणार नाही.
'सुर्याची पिल्ले' नंतर बाकीची ४ नाटकं तुम्ही कशी सादर करणार?
- याबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. पण जरा धीर धरा. ज्यावेळी 'सुर्याची पिल्ले'
चे २५ प्रयोग पूर्ण होतील, तेव्हा तुम्हाला दुसर्या नाटकाबद्दल कळेल. असे
एकामागोमाग ५ नाटकांचे प्रयोग वर्षभरात पूर्ण होतील.
तुम्ही आतापर्यंत
अभिनय केलेल्या नाटकांचा, सिरीअल्स्चा आणि चित्रपटांची नोंद
ठेवता का?
- नाही. मी याची नोंद ठेवलेली नाही. मला वाटतं मी १७ - १८ मराठी चित्रपटांमध्ये व
काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. काही सिरीअल्स व बरीचशी नाटकं ज्याचा
काही नोंद नाही.
तुम्हाला हिंदीमध्ये महेश मांजरेकरच्या चित्रपटात पाहिल्याचे आठवते. कसा होता हा
अनुभव?
- मी फक्त महेशच्याच चित्रपटात नव्हे तर परेश कामदार व प्रियदर्शन यांच्या
चित्रपटांतूनही भूमिका केली आहे. 'मेरे बाप पहले आप' मधील अनुभव काही आगळाच होता.
तब्बू सारख्या ख्यातनाम अभिनेत्रीबरोबर भूमिका करण्याचा मान तुम्हाला
मिळाला. कसा होता हा अनुभव?
- तब्बू ही एक अप्रतिम अभिनेत्री आहे. सेटवर काम करताना ती एका चांगल्या
मैत्रिणीप्रमाणे वागायची. आम्ही बर्याचवेळा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असू.
एक चांगली मैत्रिण म्हणून मी तिचा उल्लेख करेन.
तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर तुम्ही दोन व्यक्तिंचा आवर्जुन उल्लेख केला आहे. काय सांगाल
त्यांच्याबद्दल?
- विनय आपटे यांच्याबद्दल बोलायचे म्हणजे ते माझे गुरु आहेत. अभिनयातला पहिला ब्रेक
त्यांनीच दिला. आजही ते मला गुरुस्थानी आहेत. विक्रम गोखले माझे आवडते कलाकार.
तरुण वयात त्यांची बरीच नाटकं मी पहायचो. आणि त्यांच्या अभिनयाने भारावून जायचो. 'नकळत
सारे गह्डले' मधील त्यांचा अभिनय वाखाणण्यासारखाच होता. हे दोन कलाकार म्हणजे माझे
आदरस्थान समजा.
सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल काय म्हणाल?
- सध्याचा मराठी सिनेमा मोठा बदल घेऊन आला आहे. आणि एक चांगली गोष्ट घडत आहे. एक नवा
प्रेक्षकवर्ग त्यामुळे मराठी सिनेमाला मिळाला आहे.
तुम्ही तुमच्या दुसर्या इनिंगची सुरुवात कशी करणार? यापुढे दिग्दर्शनाकडे वळणार
का?
- दिग्दर्शनात मला नक्कीच स्वारस्य आहे. पाहू पुढे काय होते ते. योग्य संधी
मिळाल्यास नक्कीच दिग्दर्शन बनेन.
|