मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Monday, April 27, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
तेजश्री वालावलकर 
मेधा साठे © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
Click Here To Read In English
उंच माझा झोका - घरोघरी सर्वांची लाडकी रमा

झी मराठी चॅनेलची लोकप्रिय मालिका 'उंच माझा झोका' च्या १०० व्या एपिसोडच्या निमित्ताने बाल रमाबाई रानडेची भूमिका करणार्‍या तेजश्री वालावलकरची भेट घेऊन तिचे मराठीमुव्हीवर्ल्ड. कॉम तर्फे अभिनंदन केले. तिची खरी शाळा आता सुरु झाली आहे. पुण्यातल्या हुजुरपागेत ती सहावीत शिकत आहे. नुकतीच शाळेतून घरी आलेली असल्याने युनिफॉर्ममधल्या रमाबाईंना बघून खूप गंमत वाटली.

गेल्या वर्षी 'आजी आणि नात' या सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी तिची भेट झाली होती. त्या चित्रपटात आधुनिक श्रीमंत घरातील लाडात सुखात वाढलेली मुलगी आजीच्या प्रेमाला आसुसलेली नात तिने छान साकार केली होती. तिचे लाडिक बोलणे, लाघवी स्वभाव, वयापेक्षा अधिक समजुतदारपणा यामुळे तिची निवड योग्य वाटली होती. आणि आजही नऊवारी साडीतली जुन्या काळातली नथ, अंबाडा सांभाळणारी रमा सुद्धा तिने तितक्याच सहजतेने साकारली आहे. यावरुनच तिच्या सहजसुलभ अभिनय कौशल्याला दाद द्याविशी वाटते.

खूप प्रश्न विचारायचे होते पण ११-१२ वर्षाच्या मुलीला बोलते करायचे म्हणजे तिला आवडतील अशा हलक्या फुलक्या प्रश्नांनीच सुरुवात करायला हवी नाही का?
 
Tejashree Walavalakar, Unch Maza Zoka * तेजश्री जेव्हा तुला ही भूमिका मिळाली तेव्हा किती दिवस सूटिंग चालणार काही माहित होतं का?
- जानेवारीत सुरु होणार आणि दोन महिने चालणार असं कळलं होतं पण फायनल स्क्रीन टेस्ट नंतर चार महिने ठरले आणि आता लोकांना खूप आवडल्यामुळे सहा महिने होऊन गेले तरी चालू आहे.

* मग तू मुंबईलाच राहत होतीस का?
- नाही मी आठवड्यातून ३-४ दिवस मुंबई आणि ३-४ दिवस पुणे असं करीत होते. माझ्याबरोबर माझी आई किंवा बाबा येतात.

* मालिकेमध्ये बाराखडी शिकत आहेस पण खर्‍या शाळेचा अभ्यास कसा होतो?
- स्टुडिओत जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी रोज एका विषयाचा अभ्यास करते. घरी
 आल्याबर मी बुडालेला अभ्यास भरुन काढते. ३री, ४थी पासूनच मी शाळेबरोबरच नाटक, गाणे, नृत्य, फॅशन शो अशा विविध गोष्टी करीत असते म्हणून मला सवय आहे. माझी आई म्हणते लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट जमली पाहिजे.

* तू अनेक माहितीपटातून, सिरीअलमधून छोट्या छोट्या भूमिका केल्यास. 'आजी आणि नात' हा तुझा मुख्यरोल असणारा मराठी चित्रपट प्रभातला १०० दिवस चालला आता 'उंच माझा झोका' चे १०० एपिसोड झाले. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली?

- तेजश्रीच्या आईने सांगितले की 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' त्याचप्रमाणे अगदी लहानपणापासून तेजश्रीला अभिनयाची आवड आहे. हे आमच्या लक्षात आले होते. तिने शाळेच्या गॅदरिंगमध्ये स्वतः लिहून दिग्दर्शित केलेल्या बालनाट्याला बक्षीसही मिळाले आहे. म्हणून आम्ही तिचा पोर्टफोलिओ बनवून काही जणांना दाखवला . तिच्या बोलण्याचा टोन आणि चेहर्‍यावरील हावभाव यामुळे तिचे हमखास सिलेक्शन होतेच. फिल्म इन्स्टिट्यूट्च्या विद्यार्थ्यांच्या छोट्या फिल्म मधेही तिने काम केले आहे.

रमेच्या भूमिकेसाठी सुद्धा १००हून अधिक बालकलाकारांच्या क्लिप्स मधून तिची निवड झाली होती आणि फायनल स्क्रीन टेस्ट मध्ये चेहर्‍यावरील हावभाव आणि मॅच्युरिटीमुळे तिचे नाव पक्के झाले.
 
* तेजश्री तुला ही भूमिका आवडली का? रोज रोज नऊवारी साडी, नथ, अंबाडा घालायचा आता कंटाळा आला असेल ना?
- नाही, कंटाळा नाही येत. मला ते सर्व आवडते. आता मला नऊवारी साडी नेसयला येते. मला हा रोल करायला खूप बरे वाटते. कारण मी हुजुरपागा शळेत शिकते. ही शाळा माधवराव आणि रमाबाईंनी सुरु केली आहे. म्हणून माझे शाळेतही खूप कौतुक होते. सर्वांकडून सहकार्य मिळते.

* कधी कधी एखादा शॉट परत परत करावा लागतो जास्त रिटेक्स झाले तर डायरेकटरांचा राग येतो का?
- नाही. आमचे विरेन सर खूप चांगले आहेत. ते मला प्रथम स्क्रिप्ट वाचायला देतात. मी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेते आणि मग तसा अभिनय करते. माझे जास्त रिटेक्स होतच नाहीत. ते कधीतरीच बदल करायला सांगतात. लाईट अरेंजमेंटला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात माझा शॉट ओके होतो.
Tejashree Walavalkar, Rama

* तुम्ही बालकांसाठी काही फॅशन शो आयोजित केले होते. त्याचे प्रयोजन काय?

- तेजश्रीच्या आईने सांगितले - वृंदावन कला प्रतिष्ठान तर्फे गणेश कला क्रिडा मंच, पुणे येथे २७ मे २०१२ रोजी एक मोठा फॅशन शो आणि २-३ छोटे फॅशन शो आयोजित केले होते त्यात तेजश्री बरोबर १४० लहान मुलांनी सहभाग घेतला होता. ज्यांना इच्छा आहे त्या मुलांना स्टेजवर वावरण्याचा अनुभव मिळावा. आनंद घेता यावा त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि धीटपणा वाढावा या हेतूने आयोजन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

 * या नंतर आणखी भूमिकांसाठी ऑफर आल्यावर काय करणार?
- तेजश्रीची आई - तिच्या अभिनयाला वाव मिळेल आणि कथानकाला आवश्यक अशी योग्य भूमिका असेल तर जरुर विचार करु कारण तिला पुढे दिग्दर्शक म्हणून करिअर करायची इच्छा आहे.

* तू नाटक, सिनेमा, डान्स, फॅशन शो, गाणं सगळ्यात भाग घेतेस. तुला सर्वात जास्त कोणत्या प्रकारात काम करायला आवडतं?
- मला नाटकात काम करायला आणि डिरेक्शन करायला आवडतं.

* आणखी तुझी काय इच्छा आहे?
- मला आमीर खान आणि अमिताभजींसोबत काम करायची इच्छा आहे.

'तथास्तू' आमच्या हार्दिक शुभेच्छा

 
 मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.