Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
तुषार दळवी
मुलाखत : उल्हास शिर्के ©मराठीमुव्हीवर्ल्डसाठी
मराठी चित्रपटसृष्टीतल्या काही अशा नायकांची नावं घ्या जे त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत. तुषार दळवी हे सुद्धा नाव अशा नावांपैकी एक आहे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात लहानाचं मोठं झाल्यनंतर मॅनेजमेंट  मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन) पूर्ण केल्यानंतर कोणीही माणूस बड्या पगाराची नोकरी बघून मुंबईत इतरांप्रमाणे स्थिरावण्याचं ठरवेल पण स्व आत्मविश्वासाने काहीसा धोका पत्करत तुषार दळवीने हे सर्व सामान्य जीवन सोडून अभिनयालाच पूर्ण वेळ देऊन त्यातच आपलं भवितव्य घडवायचं असा निर्णय घेतला.

या क्षेत्रात साधारणतः १० वर्षे काम केल्यानंतर त्याने रंगमंच, मालिका आणि चित्रपट या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका स्विकारुन त्यांना न्याय देऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. एवढच नाही तर त्याने मराठी आणि हिंदी दोन्ही कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जवाबदारीसुद्धा अगदी व्यव्स्थित पार पाडली आहे. सध्या एक अभिनेता म्हणून त्याला मागणी आहे मग ते मालिका असो किंवा चित्रपट. काही भूमिका हया त्याच्या व्यक्तिमत्त्वातूनच खुलतात. उदाहरण म्हणून सांगते. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अनोळखी हे घर माझे' या चित्रपटातली त्याची थोडी नकारात्मक छटा असलेली आणि वडिलांच्या विरोधात जाणारा मोठा मुलगा, तसेच 'रिटा' चित्रपटातील सरस्वती(रेणुका शहाणे) चा परंपरांना महत्त्व देणारा नवरा. आणि आता तो साकारत आहे भार्गवी चिरमुले हिचा खूप काळजी घेणारा, प्रेमळ नवरा 'अनुबंध' या मालिकेत. त्याच्या भूमिकांच्या या वेगळेपणाने तो कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीक्षेपात राहिला आहे. म्हणूनच तुषारबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मुंबईत  'अनुबंध' च्या सेट वर गाठलं.
Tushar Dalvi
  • या क्षेत्राची निवड- कारण आवड/ महत्त्वकांक्षा?
    - माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि काही राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा माझा सहभाग घेतला होता. त्या दिवसांमध्ये मी माझ्या अभ्यासाव्यतिरीक्त माझा छंद जोपासण्यासाठी रंगमंचावर काम करत होतो तेव्हा मी प्रायोगिक नाटक जास्त केली होती. पण जेव्हा मी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा मी एका विदेशी बॅकेबरोबर प्रोजेक्ट करत होतो, आणि तेव्हाच मी ठरवलं की अभिनयातच करीअर करायचं.
    •  तुझ्या या निर्णयाला तुझ्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झाला का?
       - हो. इतर आशावादी आई-वडिलांप्रमाणे त्यांनाही माझा हा निर्णय फारसा पटला नव्हता. पण त्यांचा पूर्णपणे विरोधही नव्हता. लग्नानंतर, माझी बायको मालविका जी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, तिने मला खूप सपोर्ट केला. आणि माझ्या सुदैवाने मला फारस स्ट्रगल कराव लागलं नाही. माझा निर्णय स्विकारल्याने मी माझ्या आई-बाबांच आणि मालविकाचा खूप खूप आभारी राहील. कारण त्यांच्या सपोर्टचा शिक्का मिळण महत्त्वाचं होतं आणि तो मिळाला.
       
    • तुला असं वाटत नाही का की स्त्रीप्रधान चित्रपट किंवा मालिकांमध्ये त्यांच्या नवर्‍याची भूमिका करुन तुझ्या भूमिका एकसंघी झाल्या आहेत?
      - नाही. मला नाही असं वाटतं. तुम्ही ज्या चित्रपटांचा आणि मालिकांचा संदर्भ लावताय, त्या जरी स्त्रीप्रधान असल्या तरी त्यातून मला माझ्या अभिनयाला खूप वाव देण्याची संधी होती. उदाहरणच द्यायच झालं तर मिसेस. माधुरी दिक्षित या मालिकेच देता येईल. कारण त्या मालिकेच्या प्रसारणानंतर थोड्याच काळात प्रेक्षक तिला मिस्टर. माधुरी दिक्षित असे ओळखू लागले.
       
    •  गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटात खूप बदल झालेत.. तू त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतोस?
      - मराठी चित्रपटांमध्ये जो बदल आला आहे तो चांगला आहे. आपल्या मराठी चित्रपटांना जी विनोदाची परंपरा होती ती आता चांगल्या कथानकातून मांडण्यात येत आहे. 'श्वास' ने वेगळा मार्ग दाखवल्यानंतर प्रेक्षकांची आवड्-निवड बदलू लागली आहे. तांत्रिक दृष्ट्यासुद्धा मराठी चित्रपट आता समृद्ध झाला आहे. त्या चित्रपटांची तुलना आपण आता बॉलिवूडमधल्या चांगल्या चित्रपटांसोबत करु शकतो. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपट वितरण. सुभाष घई, झी नेटवर्क, आय ड्रीम प्रॉडक्शन्स अशा बड्या कंपन्या मराठी चित्रपटांचे वितरण करण्यासाठी पुढे सरसावल्याने मराठी चित्रपटांना खूप फायदा झाला आहे. काही वर्षापूर्वीचा काळ बराचसा वाईट गेला होता तेव्हा वर्षाला सरासरी २५-३० सिनेमे प्रदर्शित झाले होते. पण आता आठवडयाला कमीत कमी १ ते २ चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
       
    • मराठी चित्रपटांच्या सध्याच्या प्रेक्षकवर्गाचा तू अभ्यास केला आहेस का?
      -हो. मल्टीप्लेक्समध्ये येणारा प्रेक्षकवर्ग साहजिकच वेगळा आहे. इंग्रजी अनुच्चारण उपलब्ध असल्याने अमराठी माणूससुद्धा आपल्या मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गात सामील झाला आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' सारख्या २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी हे सिद्ध केले आहे.
       
    • मॅनेजमेंट मध्ये तू पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहेस. स्वतःची निर्मितीसंस्था काढण्याचा तुझा काही प्लान आहे का?
      - या क्षेत्रात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचं हे स्वप्न आहे. पण मला आता ह्या क्षणी या बद्दल जास्त काही बोलायचं नाही. मी गेल्या काही काळात निर्मिती सहाय्य केलं आहे पण माझी स्वत:ची निर्मिती संस्था हे तर वेळच ठरवेल. आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या घडून येण्यासाठी योग्य वेळ लागते आणि तुम्हाला त्यासाठी वाट बघावी लागते.
       
    • तुझ्या सहकलाकारांचा तुझ्यावर किती प्रभाव आहे?
      - मी आता पर्यंत खूप वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं आहे. त्यातले काही एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत पण ते चांगले कलाकार नाहीत. तसेच काही माणसं कलाकार म्हणून जरी परिपूर्ण असली तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ते एक चांगला माणूस नाही. पण मी त्यांच्याकडून नेहमीच चांगल शिकण्याचा प्रयत्न करतो मग तो एखाद्याचा अभिनय गुण असू शकतो किंवा एखाद्याच प्रत्यक्ष आयुष्यातल माणूसपण.


     

    


    मुख्यपृष्ठ
    I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
    ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
    Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
    Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
    © 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

    -: A Project by :-
    Honeybee Media
    Honeybee Media Pvt. Ltd.