आपल्या दिग्दर्शनातून राजकिय आणि सामाजिक विषय हाताळल्यानंतर अवधूत प्रथमच आपल्या
प्रेक्षकांसाठी 'जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा' या चित्रपटातून एक आगळी-वेगळी प्रेमकथा
घेऊन येत आहे. अवधूतचा चित्रपट आणि वेगळेपण हे ठरलेलं समीकरण याही चित्रपटात बघायला
मिळणार आहे.
या चित्रपटातील एका गाण्यासाठी अवधूतला पुण्याच्या हिरवाईचं चित्रीकरण करायचं होतं
यासाठी अवधूतने दोन महिने प्रतीक्षा करुन पावसाळ्यानंतर हिरवाईने फुलून आलेलं पुणे
शहर कॅमेराबद्ध केलं आणि या हिरवळीच चित्रीकरण त्याने थेट हेलीकॉप्टरमधून.
चित्रपटातील गीतातील दृश्यासाठी हे स्पेशल 'चॉपर' शूट करण्यात आलं असून कॅमेरामन
राहुल जाधव यांच्या कॅमेराअँगलमधून हे दृश्य चित्रीत झालं आहे.
'झेंडा' आणि 'मोरया' चित्रपटाच्या यशानंतर निर्माते अतुल कांबळे आणि अवधुत गुप्ते
यांच्या 'ए स्क्वेअर एण्टरटेनमेंट या बॅनरखाली 'जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा' या
चित्रपटाची निर्मिती होत आहे. पंजाब मध्ये दीड महिन्याच्या शूटिंग शेड्युलमध्ये
बनलेला पहिला बिग बजेट मराठी चित्रपट हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. या चित्रपटात
अभिजीत खांडकेकर नायकाच्या भूमिकेत आहे. पंजाबमध्ये जाऊन मराठी ढाबा सुरु करणार्या
महत्त्वकांक्षी तरुणाची कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
|