Untitled Document
Change Language: English  | Tuesday, September 07, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document
Untitled Document
मराठी चित्रपट 'गाभ्रीचा पाऊस '
Gabharicha Paus निर्माते: प्रशांत पेठे
दिग्दर्शक: सतिश मानवर
कथा: सतिश मानवर
कलाकार: गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, ज्योती सुभाष
गाभ्रीचा पाऊस : कथा आणि व्यक्तिरेखा यात सरस

प्रशांत पेठे निर्मित आणि सतीश मनवर दिग्दर्शित गाभ्रीचा पाऊस या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि व्यक्तीरेखांची घट्ट वीण पहता त्याला विविध ठिकाणी मिळालेल्या सर्वोत्कृष्टतेच्या पारितोषिकांबद्दल आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात काही काळापूर्वी घोंगावत असलेल्या कर्जबारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनांची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात निसर्गाच्या लहरीवर व माणसांच्या जिद्द आणि नाकर्तेपणा या दोन्हींवर सकस कथेच्या आधारे प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट केवळ मराठीच नव्हे तर सर्वभाषीय प्रेक्षकांनी पहावा असा आहे.

या चित्रपटाची कथा तीन ओळीतच संपते. पन तिची वीण अशी काही घट्ट विणली आहे की, तिचा एकएक धागा मनाचा पिळ पाडणारा आहे. कृष्णा या विदर्भातील शेतकर्‍याची पूर्वी तीस एकर जमीन होती. पण वाडवडिलांच्या कर्ज फेडीत तिचा बराच भाग सावकारांच्या घशात गेला. आज कृष्णाकडे सात एकर जमीन आहे. पण दुष्काळी स्थितीमुळे सलग दोन वर्षे पाऊस न पडल्याने त्याला शेती पिकवायला इतरांप्रमाणेच कायम अडचणी येत आहेत. कर्ज न फिटल्याने आजूबाजूला शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. कृष्णाच्या शेजारीच शेत असलेल्या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणा व शेतीची दैना यांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडते व कृष्णाची पत्नी संकट आपल्या इतक्या जवळ नांदते आहे, हे जाणवून मुळापासून हादरते. कृष्णा हा तसा मनाचा घट्ट आहे. त्याला जिद्दीने शेती करायची आहे. त्याच्या शेतात तो भाडयाने बैल घेऊन नांगरणी, औत घेऊन पेरणी करायची तयारी करतोय. त्याची आई, पत्नी आणि लहान मुलगा एवढा परिवार आहे. कृष्णाला सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे. त्याला बैल मिळत नाहीत कारण मालकाने त्यांना खायला वैरण घालता येत नाही म्हणून विकून टकले आहे. मग हा शेजरच्या गावातून ट्रॅक्टर आणतो. त्याची पत्नी संभाव्य संकटाला घाबरुन असते. पण ती त्याला आपले दागिने गहाण ठेवायला सांगून पेरणीला पैसे देते. पेरणी होते, पण लहरी पाऊस लवकर पडत नाही. पेरणी वाया जाते मग बरेच दिवस वाट पाहून पाऊस पडतो. पेरणी पुन्हा होते. यावेळी पत्नी दागिने विकून पैसा उभा करते. आणि पावसाची वाट पहात आकाशाकडे डोळे लावून बसतात. पाऊस उशीरा येतो. पण तो असा काही तुफान मारा करतो की पेरणी बरबाद होते. त्यालाच म्हणतात 'गाभ्रीचा पाऊस'. अभद्र पाऊस. कापूस बियाणे पेरताना कृष्णाने सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. पावसाच्या कचाट्यातून वाचून जो काही कापूस आलेला असतो तो सावकार कर्जापोटी घेऊन जातो. कृष्णाला पुन्हा पेरणीची, पार्‍याची गरज भासू लागते. विहीरीचे पाणी काढण्यासाठी तो बोअर खणतो त्यासाठीही पैसे लागतात. त्याच्या शेतालगत आपले शेत असलेला एक आरामशीर, अनुभवी शेतकरी त्याला वेळोवेळी या शेतीतील नुकसानीची कल्पना देऊन त्याच्यातला लढाऊ शेतकरी संपवायची कामगिरी नकळत करत असतो. कर्ज घेऊन, विहिर खणून, बियाणे आणून भाडे देऊन नांगरणी करुन काय होणार... तोटाच ना त्यापेक्षा काहीच केले नाहीतर काय फरक पडतो, असे त्याचे तत्त्वज्ञान असते. आपला नवरा आत्महत्येच्या विचारापर्यंत जाईल म्हणून पत्नी आपल्या बारक्या मुलाला व सासूला त्याच्या सतत पाळतीवर रहायला लावते. त्याच्या मनात तसे काहीच नसते. उलट त्याला शेती कोणत्याही परिस्थितीत करायचीच असते. त्याच्या आरामशीर शेतकर्‍यालाही तो यावरुन फटकारतो. आरामशीर शेतकरी त्याला सांगतो की विजेवर चालणारा पंप आणलास, पण वीज कशी चोरायची ते पहा आणि शेती फुलव. कृष्णा एका रात्री नाइलाजाने ही कसरत करायला जातो आणि विजेचा झटका बसून मरण  पावतो. त्याचा मृत्यू हा आत्महत्या म्हणूनही धरला जात नाही.

अशी ही कथा. त्यातील महत्त्वाच्या व्यक्तीरेखा कृष्णा, त्याची पत्नी त्याची आई आणि त्याचा मुलगा. कथा विदर्भाच्या पार्श्वभूमीवरची. कृष्णाची भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी त्यातील स्वभावाच्या बारीकसारीक तपशीलांसह उभी केली आहे. कोठेही नकलीपणा वाटत नाही हे त्यांच्या अभिनयाचे यश. त्याची पत्नी सोनाली कुलकर्णी यांनी त्यातील नाजूक भावबंधांसह अचूकपणे सादर केली आहे. ज्योती सुभाष यांची समजुतदार, खेडवळ पण संसारी शहाणपण असलेली आई हे या चित्रपटाचे अनन्यसाधारण वैशिष्टय आहे. इतरांच्या आत्महत्यांमधून स्वतःचा आर्थिक फायदा शोधणारी मंडळीही यात आहेत. विदर्भातील एका खेड्यातच चित्रण केले आहे. त्यामुळे सर्व घटना व पात्रे नैसर्गिक वाटतात. कथेचा शेवट एकदम नायकाच्या अचानक होणार्‍या मृत्यूने होतो. शोकांतिका हेच भारतीय शेतकर्‍याचे व विशेषतः विदर्भातील कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जीवनाचे सत्य आहे, हे सांगण्याचा दिग्दर्शकाचा हेतू आहे. शेवट सुखी केल्यास आशीच्या सर्वच घटनांना कोणताच अर्थ उरला नसता. सुधीर पलसाने यांचे छायाचित्रण चित्रपटाच्या कथेच्या वातावरणाशी जुळणारे आहे. दत्तप्रसाद रानडे यांनी विदर्भाच्या मातीतली दोन गाणी ज्या सुंदर चालींनी दिली आहेत, ती ऐकत रहावीशी वाटतात. एकूणच पुन्हापुन्हा पाहून मनन करावा असा हा 'गाभ्रीचा पाऊस' आहे.

दर्जा:  
संजय दिनकर
© मराठीमुव्हीवर्ल्डसाठी

चित्रपट:    
 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क