गंध :
आयुष्यातील गुंतागुंतीचा
गंध मध्ये सचिन कुंडलकर याने तीन कथा स्वतंत्रपणे दाखवल्या. या तीन कथा
बांधून ठेवणारे एक सूत्र आहे, ते म्हणजे गंध, सुवास. लग्नाच्या वयाची मुलगी
ही पहिली कथा तर सदाशिव पेठेतील साठच्या दशकातील घराघरात चाललेल्या
कुटुंबनाटयाची जशीच्या तशी मांडलेली कहाणी. पण तिला एक रंगतदार डूब आहे.
ब्राम्हण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी, काळी सावळी, तिचे लग्न त्यामुळे
जमत नाही. आईबाप श्रद्धाळू, आई रोज देवाला नवस बोलणारी. मुलीला पाहण्याचे
प्रयोग होत आहेत. चहापोहे बशा भरुन होत आहेत. पण कुठेतरी पोरगी मार खात आहे.
ती मुलगी कला विद्यालयात कारकून आहे. पण तिचे वय पाखरासारखे भिरभिरण्याचेच
आहे. तिला कामाच्या ठिकाणी कला महाविद्यालयात शिकणार्या मुलाजवळून किंवा
तो तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध येतो. या सुगंधाचा (खरे म्हणजे
मुलाचा ठाव ठिकाणा) शोध घेण्यासाठी ती त्याचा माग काढते. तर रात्री तो एका
उदबत्त्यांच्या कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या
व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ साधण्याची कल्पना काही और आहे. अमृता
सुभाष आणि गिरीश कुलकर्णी ही निवड येथे अगदी अचूक आहे.
|
 |
दुसरी कथा वेगळ्याच विश्वात नेते. ती
प्रेक्षकांना औषधांच्या गंधात नेते. एक मध्यमवयीन तरुण घरात एकटाच बसलेला.
तो मोलकरणीला सांगतो की आज दोघांच जेवण बनवा, बायको येणार आहे. बायको येते.
तिला माहित असते की हा सतत औषधे घेतो आहे. तो एचआयव्ही बाधित आहे. औषधांचा
वास सहन करीत ती येते, त्याला भेटण्यासाठी. त्यांच्या गप्पांमधून समजते की
ती त्याच्यापासून वेगळी रहाते आहे. नाईलाजच आहे. तो तिला भेटवस्तू देतोय.
लग्नाचा वाढदिवस असावा. तिला आल्यापासून कसला तरी वास येतोय. घाण वास.
औषधांचा नाही. दुसराच कसला तरी. हा तिच्याबरोबर सुखदु:खाच्या गोष्टी बोलून
झाल्यावर घटस्फोटाचे कागद तिच्यासमोर ठेवतो. तिला वास येतच असतो. तो
शोधण्यासाठी सारं घर पालथ घालते. नंतर जे काही घडते तो एक थरकाप आहे. सोनाली
कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी या भूमिकांना न्याय दिला आहे. ...... |
तिसरी कथा कोकणातील कुटुंबाची आहे. त्या घरात एक बाई मुलाला जन्म देते आहे.
तिची वहिनी महिन्यातले चार दिवस बाहेर बसावे लागते त्याप्रमाणे बाहेर बसली
आहे...खरं तर सासूला अशा वेळी तिच्या मदतीची गरज आहे. पण रीतीरिवाज कडक
असल्याने ते शक्य नाही. हिचा नवराही बाहेरगावी गेलाय, पाऊस धो धो पडत
असल्याने तो रात्रभर परत घरी यत नाही. त्याची काळजी, सासूचे टोमणे, स्वतःला
इतकी वर्षे मूल नसल्याचे दु:ख. तिची जाऊच काय ती तिला मान देणारी. तिचा
पुतण्या काकूची करमणूक करतोय, तोच विरंगुळा. एका दु:खाची ही सल नेमकी
व्यक्त होते. वास इथेही आहे. बाजूला बसलेल्या बाईचा, ओल्या बाळंतिणीचा.
बाळाला दिलेल्या शेकाचा. बाजूला बसलेली बाई नीना कुलकर्णी नेहमीच्या
कौशल्याने साकारतात. अशा या तीन कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडाव्यात.
|