प्रेक्षकांना
आवडतेय दिग्दर्शक केदार शिंदेची हलकी फुलकी रोमॅन्टीक भेट !
उत्तम कॉमेडी
सेन्स असलेल्या केदार शिंदेचा बर्याच दिवसांनी आलेला हलका फुलका मराठी
चित्रपट 'इरादा पक्का' वैवाहिक जीवनात पिकून गेलेल्या जोडप्यांसाठी नक्कीच
एक रिफ्रेशमेंट आहे.
|
|
'इरादा पक्का'ची
कथा एका हॅपनिंग आणि रोमँटिक तरुण जोडपे रोहित आणि आद्याची आहे. रोहित
(सिद्धार्थ जाधव) हा एक वेब डिझाईनिंग कंपनी चालवतो आणि त्याची बायको आद्या
(सोनाली कुलकर्णी) ही एका प्राथमिक शाळेमध्ये
शिकवते. त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालू असते. कधी ना भांडण ना कसली
कटकट ह्यामुळे ते त्यांच्या शेजार्यांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी एक
आदर्श जोडपे असते. पण मग हेच आयुष्य त्यांना खटकते आणि थोडेसे का होईना
भांडण नसले तर जीवनात काही मजा नाही असे त्यांना वाटू लागते. म्हणूनच की
काय ते एक पूर्ण आठवडा खोटे भांडायचे ठरवतात. आठवड्यातले वारही ते वाटून
घेतात. अगदी ठरवून भांडतात आणि त्याचा तमाशा करतात पण नंतर तेच त्यांच्या
अंगाशी येते आणि ते नॉर्मल बोलणेच विसरुन जातात. भांडण्यात आनंद मिळवण्याच्या प्रयत्न करता करता एकमेकांच्या जीवावर उठतात. आणि नंतर त्या
भांडणाचे रुपांतर घटस्फोटापर्यंत येऊन पोहचते. |
 |
हल्ली छोटया छोटया कारणाने घटस्फोटाचे प्रमाण वाढलयं, हाच गंभीर विषय
विनोदीपणे केदार शिंदेने मांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट तरुणांना आकर्षित
करेल ह्यात शंकाच नाही. सुरुवातीपासून विनोदी असलेला हा चित्रपट एकही पी.जे
न मारता सादर केला आहे. शेवट काय असेल ह्याची कल्पना आल्या नंतरही हा
चित्रपट सिद्धू व सोनालीच्या उत्तम टयमिंग सेन्समुळे खिळवून ठेवतो. नटरंग
मध्ये आपण सोनालीची नृत्य कला पाहिली पण ह्या चित्रपटातून तिने आपण अभिनयही
करु शकतो हे दाखविले आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जाणकारांना शंका होती की नेहमी साईडहिरोच्या
भूमिकेत वावरणारा सिद्धार्थ जाधव नायकाची भूमिका पेलवू शकेल का? पण
सगळ्यांना चकीत करत त्याने ही भूमिका अत्यंत ताकदीने पेलली आहे. त्यामुळे
नायक म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट असल्याचे कुठेही जाणवले नाही. सोनाली
कुलकर्णी ह्या गोड चेहर्याच्या मुलीनेही अत्यंत अवखळपणे त्याला साथ दिली
आहे. तरूण पिढी नजरेसमोर ठेवून केदारने हा चित्रपट बनविला आहे. मूळ कथानकास
जोडलेली उपकथानकेही अतिशय लाजवाब! विशेष करुन भाई सत्यवान व सावित्री ही
दोन पात्र. कमलाकर सातपुतेची भाईची भूमिका, स्मिता जयकरची सोनालीच्या
घटस्फोटीत आईची भूमिका विशेष उल्लेखनिय वाटते. इरावती कर्णिक यांच्या
संवादात त्यांनी सध्याच्या तरुणाईची भाषा वापरल्यामुळे विशेष परिणामकारक
वाटतात.
संगितकार निलेश मोहरीर यांची गाणी अतिशय मधूर वाटतात, विशेषतः 'भिजून गेला
वारा'. आणखी एक सर्प्राईज म्हणजे 'मागे ना जाणे. . .' ह्या गाण्यात केदारने
मराठी चित्रपटसृष्टीतील २१ हॅपनिंग जोडया रामदास पाध्ये व त्यांच्या
बाहुल्यांसोबत नाचविले आहे.
|