Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
नाट्य परीक्षण :  सासू माझी ढाँसू'
'सासू माझी ढाँसू' - एक फुल टु धमाल विनोदी नाटक. Click Here To Read English
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या 'सासू माझी ढाँसू' या नव्या कोर्‍या नाटकाने प्रशांत दामले व रिमा या मातब्बर कलाकारांना प्रथमच एकत्र आणले आहे. त्या दोघांच्या रंगमंचावरील प्रवेशालाच प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करतात.

हेमंत एदलाबादकर लिखित व राजेश देशपांडे दिग्दर्शित 'सासू माझी ढाँसू' हे नाटक म्हणजे हास्याचा धबधबाच म्हटले तर ते वावगे होणार नाही.

नाटकाचे कथानक तसे साधे सरळ. कर्जात बुडालेला विजय सहस्त्रबुद्धे (प्रशांत दामले) आपली धनाढ्य सासू लक्ष्मी कारखानीस (रीमा) यांची आतुरतेने वाट पाहत असतो. आपला मित्र (अक्षय पेंडसे) यांच्या मदतीने सासुकडून मोठी रक्कम पदरात पाडून घेण्याचा त्याचा डाव असतो. त्या डावात त्याची पत्नी हिमानी (नीना पेंडसे) हि देखील सामिल असते.

पाच वर्षांपुर्वी आपल्या लेकीबरोबर पळून जाऊन लग्न केलेला आपला जावई जीवनात किती यशस्वी झाला आहे. हे आपल्या सासूला पटविण्याचा विजयचा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी तो आपल्या मित्रालाच विजय सहस्त्रबुद्धे बनवतो व मित्राचा बंगलाही विजयचा असल्याचे भासवतो. विजय स्वतः मात्र पंडित नावाचा नोकर बनून त्या बंगल्यातच वावरणार असतो. पण ऐनवेळी त्याचा मित्र या सगळ्या नाटकाला कंटा़ळून आपला हरहुन्नरी मावसभाऊ सोन्या (संदिप फाटक) याला पैसे देऊन विजय सहस्त्रबुद्धे बनायला भाग पाडतो.

सासू (रिमा)चे जेव्हा आगमन होते तेव्हा तिची गाठ प्रथम हिमानीशी व त्यानंतर 'पंडित' या नोकराच्या वेषातील प्रशांत दामलेशी पडते आणि सुरु होते मिनिटागणिक हास्याचे फवारे उडविणारी धमाल शाब्दिक जुगलबंदी.

''सासू माझी ढाँसू' ही एक प्रासंगिक कॉमेडी आहे. चुरचुरीत संवाद, पात्रांची सुयोग्य निवड व सर्व पाचही पात्रांचा उत्कृष्ट अभिनय या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत, सर्वच कलाकारांनी अचुक टायमिंग व योग्य देहबोलीने नाटकात 'जान' आणली आहे.

प्रशांत दामले व रिमा यांनी अपेक्षेप्रमाणे आपापले कसब पणाला लावून ताकदीने भूमिका वठवल्या आहेत. पण सर्वात सुखद धक्का दिला आहे तो सोन्या बनलेल्या संदिप फाटक यांनी. त्यांची सडसडीत शरीरयष्टी आणि लवचिकता यांचा दिग्दर्शकाने योग्य वापर करुन अनेक हास्यकारक प्रसंग निर्माण केले आहेत. विशेषतः विजय सहस्त्रबुद्धे फुंकर मारतो तसा सोन्या दूर दूर फेकला जातो. तसेच झोपलेल्या सोन्याला विजय दिवाणखान्यात घेऊन येतो. या प्रसंगांना प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटाने दाद देतात. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी अत्यंत खुबीने प्रत्येक कलाकाराच्या विशिष्ठ अभिनय शैलीचा वापर करुन घेतला आहे. अशोक पत्की यांचे पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाला साजेसेच आहे. बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य सुयोग्यच आहे.

एकंदरीत हे नाटक प्रेक्षकांच्या विनोदी नाटकाबद्दलच्या अपेक्षांना पुरेपुर उतरले आहे असे म्हणावे लागेल.


उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी

 
सासू माझी ढाँसू
निर्मिती संस्था: प्रशांत दामले फॅन फाउंडेशन
लेखक: हेमंत एदलाबादकर
दिग्दर्शकः राजेश देशपांडे
नेपथ्य: बाबा पार्सेकर
संगीत: अशोक पत्की
कलाकार: प्रशांत दामले, रिमा, अक्षय पेंडसे, नीना पेंडसे, संदिप फाटक
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.